श्री स्वामी नामाची गोडी

गणपत नामे माझा पिता सरस्वती माझी माता, मालवण कट्टा येथे शेतकरी घराण्यात गुराम कुळात जन्म झाला. अशोक नाव दिले देहाला माझे काका श्री.दिनकर बाबुराव गुराम हे धार्मिक वृत्तीचे होते, मला ते नेहमी स्वतःसोबत ग्रामदैवत श्री.लिंगेश्वर व श्री भराडी देवी या दोन्ही मंदिरामध्ये पुजेसाठी घेऊन जात असत. त्यामुळे हे बालमन आस्तिक बनले पुढे हरिभजनाची गोडी लागली व हाच माझा छंद बनला.

सन 1979 मध्ये मी इयत्ता 5 वी मध्ये शिकत होतो. त्यावेळी माझ्या शाळेत 10 वी चे परीक्षा केंद्र असल्यामुळे इतर गावातील विद्यार्थी परिक्षेसाठी येत असत त्यातील एका मुलाशी माझी ओळख झाली. नक्की नाव आठवत नाही. परंतु आडनाव शेटे गाव (धामापूर) एवढेच आठवते. त्याचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे नंतर आमची भेट होणार नाही. म्हणुन मी त्याची भेट घ्यावी असे ठरवले. बराच वेळ त्याची वाट पाहीली. परंतु त्या मित्राची भेट होईना. शेवटी घरी जाण्यास निघालो. मात्र शाळेच्या गेट बाहेर येताच तो मित्र समोरून येत असताना दिसला. त्याला पाहुन माझे मन आनंदीत झाले व आम्ही दोघानांही हात मिळवला. त्याच्या पेपरची वेळ होत आली असल्यामुळे जास्त काही बोलणे झाले नाही मात्र त्याने आपल्या ओळखीची भेट म्हणुन आपल्या खिशातुन श्री.स्वामी समर्थ स्त्रोत्र हे पुस्तक काढुन मला दिले व म्हणाला रोज हे वाचत जा पुस्तक घेऊन मी घरी आलो. माझ्या आईला सांगितले आईने ही मला योग्य मार्गदर्शन केले. व ते पुस्तक रोज वाचण्यास सांगितले

त्यानंतर मी नित्यनेमे ते स्त्रोत्र पठण्यास सुरूवात केली. श्री स्वामी समर्थ कोण होते. त्यांचे चरित्र काय ? या बद्दल मला काहीच माहीत नव्हते. या पुर्वी स्वामी समर्थ हे नावही ऐकले नव्हते. तरी ही का कोणास ठाऊक मला त्या स्त्रोत्राची आवड लागली निस्वार्थी निष्फळ वृत्तीने मी वाचन चालुच ठेवले. व 1982 मध्ये गुरूवारचा दिवस होता. पहाटे 3.30 ते 3.40 ची वेळ होती आणि मला स्वप्न दृष्टांत झाला. स्वामीचे अवधुत दिगंबर तेजस्वी रूपाचे दर्शन झाले. प्रथम मी घाबरलो होतो. मी स्वामीचे नामस्मरण चालु केले. एवढयातच स्वामी म्हणाले. भिऊ नकोस तु जन सेवा कर दुसर्‍यांचे मन दुखवू नकोस दुसर्‍यांचे दुःख ओळख त्यातच तुझे सुख आहे.

श्री स्वामींचे दर्शन झाले परंतु त्या रूपाला प्रथमच पाहीले होते. त्यामुळे स्वामींना ओळखु शकलो नाही. स्वप्न समजुन सोडुन दिले. या गोष्टीला जवळ जवळ तीन महिने झाले असतील नसतील तोच श्री नारायण तुकाराम गुराम यांचे टेबलवर श्री स्वामी बखर हे पुस्तक दिसले आणि मला पडलेल्या स्वप्नांचा उलघडा झाला. या पुस्तकावर मला झालेल्या दर्शनाचे हुबेहुब चित्रण होते ते पाहुन मी स्वामींना ओळखु न शकल्याची खंत करू लागलो. मात्र स्वामींचे दर्शन झाले त्याचे समाधानही तेवढेच वाटत होते. मी ही हकीगत माझे काका श्री.नारायण गुराम यांना सांगितली मग त्यांचे ही सहकार्य लाभले त्याच्या सहकार्याने मला श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ (दादर) यांचे कडुन श्रींचा एक फोटो व मानसपुजा हे पुस्तक मिळाले.

या पुढे मी स्त्रोत्र व मानसपुजा हे वाचन चालु केले. यात मी 10 वी 12 वी कसा पास झालो हे मला कळले नाही. हीस्वामींचीच लीला होती. यानंतर 22 जून 1986 ला मी मुंबईला आलो. लालबाग मध्ये आधार बिल्डींगमध्ये राहु लागलो. दादर येथे स्वामींचा मठ आहे ऐकुन माहीत होते मला आलेले मानसपुजा या पुस्तकावर श्री भाऊ मयेकर यांच्या नावाचा शिक्का होता. गुरूपौर्णिमेचा दिवस होता आज मठात जायचे असे ठरविले होते. मला जास्त ट्रेनने फिरायची सवय नव्हती. तरीही मर विचारपूस करत दादर येथील श्री स्वामी समर्थाच मठ शोधुन काढला. स्वामींचे दर्शन घेतले मला खुप समाधान व प्रसन्न वाटले. बाहेर आल्यावर मी भाऊ मयेकर याची विचारपुस केली. त्याची भेट घेतली त्यानंतर त्यांनी मला बरेच मार्गदर्शन केले. मठामध्ये होत असलेल्या आरती, भजने याची मीहीती दिली. परंतु मी काकांच्या घरी रहात असल्यामुळे रात्री 8.00 नंतर बाहेर राहु शकत नव्हतो. परंतु म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग मिळेल आणी तेच झाले 3 महीन्यातच माझी बहीण व मी असे दोघे मिळुन गोरेगाव तीन डोंगरी येथे श्री तुकाराम घाडीगावकर यांचे घरी पोट भाडोत्री म्हणुन राहु लागलो. त्या उभयतानींही आम्हा दोघां भावडांना आपल्या मुलाप्रमाणेच वागणुक दिली. त्यांचे आमच्यावर फार मोठे उपकार आहे ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या आधारामुळेच आज आम्ही स्वामी चरणासी राहु शकलो.

about-bg

त्यावेळी मी लालबाग येथे प्रेसमध्ये नोकरी करीत असल्यामुळे नेहमी दादरला उतरून मठामध्ये आरतीला जाऊ लागलो. गुरूवार, शनिवार भजनाचा आस्वाद घेऊ लागलो. प.पू.श्री.भाऊ मयेकर यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्या समवेत सामुदायीक श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या पारायणामध्ये सहभागी झालो. नंतर या पोथीचे आपण रोज पठण करावे. अशी कल्पना मनात आली. मठातील भजनामध्ये नेहमी माझ्या सोबत श्री.प्रसाद गवंडे म्हणुन एक स्वामी भक्त असायचे. त्याची ही स्वामीवर अपार श्रद्धा सतत स्वामी सेवेत सक्रिय असायचे. माझी त्याच्याशी चांगली मैत्री जमली. त्यांचा तो शांत स्वभाव नेमकेच पण गोड बोलण यामुळे एक वेगळीच ओढ निर्माण व्हायची ही एक स्वामीचीच लीला असावी. आपल्या भक्तांना एकत्रित येऊन भक्ती मार्गाची गोडी लावण्याची मी एक दिवस श्री स्वामी चरित्र नेहमी पठणाची इच्छा त्याच्यासमोर व्क्त केली. त्यांनी मला रोज तीन अध्याय वाचण्याचे सुचित केले. शुक्रवारी सुरूवात करून गुरूवारी 21 अध्याय संपवायचे व पुन्हा गुरूवारी पहील्या अध्यायाचे पाच ओवी वाचुन ठेवायचे याप्रमाणे दर आठवडयाला एक पारायण पूर्ण होऊ लागले. खरच आमच्या आईवडिलांची पुण्याई पुर्वजन्मीचे सुकृत या पारायणांनी स्वामी भक्तीशी एक रूप होऊन गेलो.

about-bg

श्री. भाऊ मयेकर व श्री दत्त भक्त प.पू.श्री जयवंत सावंत बाबा उर्फ दादा महाराज यांचा अप्रतीम सहवास व वारंवार मिळणार्या मार्गदर्शनामुळे माझ्या भक्ती मार्गात ध्यान साधनेची भर पडली आणि सतत स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली वेगवेगळे अनुभव येऊ लागले.

श्री.तुकाराम घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने मी मे 1989 मध्ये कांदीवली डहाणुकरवाडी येथे स्वतःची एक झोपडी घेतली मी व माझी मोठी बहीण येथे राहु लागलो. त्याच वर्षी श्री.भाऊ मयेकर हे मला स्वतः सोबत अक्कलकोट येथे घेऊन गेले. माझी अक्कलकोटला जायची खुप इच्छा होती. परंतु 500 रूपयामध्ये घर चालवुन काहीच बचत होत नव्हती. त्यामुळे खर्च करायचा कुठे जायचे असेल तरी विचार करावा लागत होता. परंतु पुन्हा एकदा इच्छा शक्तीचा अनुभव आला आणि अक्कलकोट येथ जाऊन त्या धुळीच्या स्पर्शाने मी धन्य झालो.

1991 मध्ये श्री. जयवंत सावंत बाबा हे मला स्वतःसोबत नरसोबाची वाडी औदुंबर व गाणगापुर येथे घेऊन गेलेत. मला शक्ती नसली तरी इच्छा शक्ती असल्यावर स्वतः परमेश्वर ती इच्छा रूपाने पूर्ण करतो मात्र त्यासाठी श्रद्धा व सबुरी असावी लागते.