महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायांत दत्तात्रेयांविषयी गाढ श्रद्धा आहे. तसेच, दत्तभक्तीचीच परंपरा विशेष करून चालविणारा दत्तसंप्रदायही महाराष्ट्रात शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. या संप्रदायात दत्तात्रेयांना आपले उपास्य दैवत मानणाऱ्या दत्तभक्तांत हिंदूंबरोबर मुस्लिमांचाही समावेश आहे.दत्तात्रेय हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी त्याच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली, ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्यानंतरच महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय उदयाला आला. औदुंबर, नरसोबा वाडी व गाणगापूर ही या संप्रदायाची प्रमुख तीर्थस्नाने बनली.
नृसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला, त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाह निर्माण झाले आणि वाढत राहिले; परंतु त्यांचे स्वरूप व्यापक नसल्यामुळे ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले आणि म्हणूनच त्यांना संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले नाही. दत्तसंप्रदायाच्या स्वरूपावर दत्तात्रेयांच्या मूलस्वरूपाचा प्रभाव विशेष आहे, ते तर खरेच; परंतु त्याच्या घडणीत, विचारआचारात दत्तावतारी महापुरुषांचाही सिंहाचा वाटा आहे. दत्तात्रेयांच्या मूलस्वरूपात पौराणिक कल्पनेनुसार चातुर्वर्ण्यसंरक्षणावर विशेष भर आहे. पुराणांनी वारंवार असे प्रतिपादले आहे, की दत्तात्रेयांचा अवतार हा चातुर्वर्ण्याच्या संवर्धनासाठी झालेला आहे.
ज्या काळात श्रीनृसिंह सरस्वतीचा अवतार झाला, त्या काळात ‘कठीण दिवस युगधर्म । म्लेंच्छराज्य क्रूर कार्य’ अशी परिस्थिती सर्वत्र होती. परिणामी ब्राह्मण वर्ग आचारदृष्ट्या शिथिल होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनृसिंह सरस्वतींनी वैदिक परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी व संरक्षणासाठी वर्णाश्रम धर्माला प्राधान्य दिले. ‘धर्मो रक्षति रक्षत:’ ही त्यांची त्यामागची प्रमुख भूमिका होती. दत्तसंप्रदायाचे उपास्य असलेले दत्तात्रेय हे एक योगी असल्यामुळे या संप्रदायात स्वाभाविकच योगालाही प्राधान्य मिळाले. अगदी चांगदेव राऊळांपासून आजपर्यंत झालेले बहुतेक महान दत्तोपासक योगी होते. नाथसंप्रदायाने तर दत्तात्रेय ही योगप्रदायक देवताच मानली आहे. नाथसिद्धांविषयी जनमानसात असा समज रूढ आहे, की ते योगसामर्थ्याने अद्भुत चमत्कार करू शकतात.
दत्तोपासनेमुळेच अशा सिद्धी दत्तोपासकांना प्राप्त होतात आणि त्यांच्या साहाय्याने ते आपली दु:खे दूर करू शकतात, आपल्या कामनांची पूर्ती करू शकतात, ही जी भावना सर्वसामान्यांच्या मनात प्रथमपासून रुजत गेली त्यातच दत्तसंप्रदायाच्या भक्तप्रियतेचे रहस्य दडलेले आहे. केवळ दर्शन-स्पर्शनाने वा आशीर्वादाने सिद्धपुरुषांनी आपल्या व्यथा-वेदना त्वरित नाहीशा करून मनोकामना पूर्ण कराव्यात, अशीही बहुतेक भक्तांची किमान अपेक्षा असते. दत्तात्रेयांची उपासना गुरुस्वरूपात करावयाची असते. कारण ते ‘गुरुदेव’ आहेत. परिणामी गुरुसंस्थेला प्राधान्य देणाऱ्या सर्व संप्रदायात दत्तात्रेयांची पूज्यता रूढ झाली.
दत्तसंप्रदाय हा प्रत्यक्षवाई, सगुणवादी आहे. जीवनाला आवश्यक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे महान कार्य आजवर दत्तसंप्रदायाने केले आहे. आपल्या भारतात जे अनेकानेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात ‘दत्तसंप्रदाय’ हा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो. यालाच ‘अवधूत संप्रदाय’ असेही संबोधिले जाते. ‘दत्तात्रेय’ हे या संप्रदायाचे आराध्य दैवत होय !शैव, वैष्णव व शाक्त या तीनही उपासना प्रवाहांना व्यापणारा दत्तात्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे. आपल्या महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, सांप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. महानुभाव, नाथ, वारकरी आणि समर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्रि अनसूयेचे पुत्र आहेत; परंतु ते अयोनिसंभव आहेत. महाभारतात वन, शांति व अनुशासन पर्वात दत्तात्रेयांनी सहस्त्रार्जुनावर कृपा केल्याचा उल्लेख आढळतो.
गुंतागुंतीचा आणि रहस्यमय दत्तसंप्रदाय – हा संप्रदाय बराचसा अगम्य, काहीसा गुंतागुंतीचा आणि तितकाच रहस्यमय आहे. वास्तविक उत्तर भारत हा वैष्णवपंथी असून दक्षिण भारत शैवपंथी मानला जातो. या दोन्ही पंथांचा समन्वय दत्तसंप्रदायात झालेला दिसून येतो. या संप्रदायाची मुळे जरी महाराष्ट्रात रुजलेली असली तरी गुजरात, कर्नाटक व आंध्रमध्येही दत्तोपासना मोठ्याप्रमाणात विस्तारलेली आहे. सौराष्ट्रातील जुनागढजवळचे ‘गिरनार’ हे या संप्रदायाचे प्राचीन स्थान असून जैन, मुस्लिम, हिंदू, बौद्ध संस्कृतींचा समन्वय असलेल्या या जागी दत्तात्रेयांचे मूळ स्थान आहे.
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार. कारंजा (लाड) जि. वाशिम या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे-त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
।। श्री स्वामी समर्थ ।।
नित्य स्मरावे स्वामींना
दत्तस्वरुप ते निरंकार
रोज विसरावा तो अहंकार
काम, क्रोध करतो सर्वनाश
अती लोभात होतो विनाश
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ
अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ
मितभाषी असतो सदासुखी
व्येर्थ बोलेल तो होईल दु:खी
समर्थ नामास रोज स्मरावे
माय बापास कधी न भुलावे
मनुष्य जन्म मिळतो एकवार
स्वामी नामात सुख ते अपरंपार
।। श्री स्वामी समर्थ ।।